सयाजी शिंदे-पार्थ भालेराव घेऊन येताहेत 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'पावटॉलॉजी' म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्न चित्रपटाच्या शीर्षकावरून पडणे साहजिकच आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. ११ एप्रिल रोजी 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या आगामी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. विजय नारायण गवंडे, श्रीकांत देसाई या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी या दिग्दर्शक जोडगोळीने सांभाळली आहे.
नुकतेच पुण्यामध्ये चित्रपटाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले. याप्रसंगी सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पार्थ भालेराव, अपूर्वा चौधरी, देवेंद्र गायकवाड, दीप्ती देवी, हरीश थोरात, दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी, प्रस्तुतकर्ते हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर, निर्मात्या नेहा गुप्ता, सहनिर्माते विजय गवंडे, श्रीकांत देसाई आदी मंडळी उपस्थित होती.
या चित्रपटाच्या निमित्ताने सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकणी हे दोन दिग्गज अभिनेते प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे.
चित्रपटाची कथा संतोष शिंत्रे यांनी लिहिली आहे. दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनाची जबाबदारीही प्रसाद नामजोशी यांनी सांभाळली आहे. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधुर संगीत दिले असून, मंदार कमलापूरकर यांनी ध्वनी आरेखन केले आहे. दिग्दर्शनासोबतच सागर वंजारी यांनी कार्यकारी निर्मात्याचे काम चोख बजावत संकलनही केले आहे. गिरीश जांभळीकर यांनी छायांकन केले आहे. रश्मी रोडे यांनी वेशभूषा तर श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे. कला दिग्दर्शन निलेश गोरक्षे यांचे असून, अमिन काझी यांनी व्हीएफएक्स केले आहेत. निर्मितीव्यवस्था प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांची आहे.