पाँडिचेरी एक्सप्रेसमधून 11 लाखांचे दागिने चोरीस

दादर ते पाँडिचेरी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या दोन ते तीन प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी हॅन्डबॅग व पर्स चोरल्या. त्यामध्ये तब्बल 11 लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली.
सातारा : दादर ते पाँडिचेरी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या दोन ते तीन प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी हॅन्डबॅग व पर्स चोरल्या. त्यामध्ये तब्बल 11 लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली. या घटनेची नोंद मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळी रेल्वेच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी भेटी देऊन तपासासाठी पथके नेमली आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ही घटना सोमवारी पहाटे कोरेगाव रेल्वेस्टेशनवर घडली आहे.
जया सीलन मेलकुरे हे दादर पाँडिचेरी एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्याकडील हॅन्डबॅग चोरट्याने लांबवली. यामध्ये साडे चार लाख रूपये किमतीचे पाच तोळ्याचे मंगळसूत्र, 90 हजार रूपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, चार तोळ्याच्या साडे तीन लाखांच्या दोन सोन्याच्या चैनी, मोबाईल व 10 हजारांची रोकड असा तब्बल 10 लाख 83 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर जयाराणी अंतोनी समिती यांचाही मोबाईल आणि रोकड असा मिळून 56 हजारांचा मुद्देमाल लांबवला आहे. या घटनेत असा 11 लाख रूपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला आहे.
या प्रकरणी सवारीमुथू अनथोनिसमी कौनदार (वय 46, रा. टेंबिनाका, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी मिरज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे. पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांच्यासह अन्य अधिकार्यांनी भेटी दिल्या.