अशोक सराफ-वंदना गुप्तेंच्या 'अशी ही जमवा जमवी'चं पोस्टर रिलीज

अशोक सराफ आणि वंदना गुप्ते मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी दिले आहेत. आता हे दोघंही अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
मुंबई : अशोक सराफ आणि वंदना गुप्ते मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी दिले आहेत. आता हे दोघंही अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आगामी 'अशी ही जमवा जमवी' या मराठी सिनेमात त्यांची मुख्य भूमिका आहे. लोकेश गुप्तेने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. सिनेमाच्या टायटलनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
१९८८ साली आलेला'अशी ही बनवा बनवी' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आता तसंच काहीसं टायटल असलेला 'अशी ही जमवा जमवी' सिनेमा १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या कसलेल्या कलाकारांचा धमाल अभिनय सिनेमात पाहायला मिळणार आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर पाहून अतिशय खुमासदार आणि मनोरंजक अशा या गोष्टीबद्दल प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झालेली आहे.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून यामध्ये टेबलच्या एका बाजूला अशोक सराफ आणि समोर वंदना गुप्ते बसल्या आहेत. त्यांच्यासोबत दोन नवोदित कलाकारही झळकणार आहेत. ओंकार कुलकर्णी आणि तनिष्का विशे ही जोडी टेबलखाली बसलेली आहे. पोस्टरच इतकं भन्नाट आहे त्यामुळे सिनेमा किती मजेशीर असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. "खट्याळ, गोंडस, मजेदार, हळवी… 'अशी ही जमवा जमवी' असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे.
सिनेमाच्या आकर्षक शीर्षकावरून रंजक कथेची कल्पना येते. आता ही जमवा जमवी नक्की कसली, कोणाची आणि कशाप्रकारे होणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे जे १० एप्रिल २०२५ रोजी कळेलच. कारण याच दिवशी ‘राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात आपल्या भेटीला येणार आहे.