संत तेल्या भुत्याच्या कावडीने सर केला मुंगी घाट

येथील शंभू महादेव यात्रेत बुधवारी मुंगी घाटातील कावड सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मानाच्या कावडी चढविताना ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमून गेला.
शिखर शिंगणापूर : येथील शंभू महादेव यात्रेत बुधवारी मुंगी घाटातील कावड सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मानाच्या कावडी चढविताना ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमून गेला. भक्तीशक्तीचा हा विराट सोहळा पाहण्यासाठी मुंगी घाट परिसरात लाखो भाविकांची उपस्थिती होती. रात्री उशिरा सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी शिव-पार्वतीच्या हळदी सोहळ्याने प्रारंभ झाला. त्यानंतर अष्टमीच्या दिवशी विवाह सोहळा झाला. याचदिवशी शंभू महादेव मंदिर ते बळीच्या मंदिरास मानाचे पागोटे (ध्वज) बांधण्याचा सोहळा उत्साहात झाला. नवमीच्या दिवशी धााराशिव जिल्ह्यातील भातांगळी येथील देवाची करवली असलेल्या मानाच्या काठीने शंभू महादेवाचे दर्शन घेतले, तर शुक्रवारी एकादशीच्या दिवशी लाखो शिवभक्तांनी एकादशीचा उपवास धरून महादेवाचे दर्शन घेतले, तर सायंकाळी इंदोर राजघराण्यातील काळगावडे राजे यांनी घोड्यावरून येऊन दर्शन घेतले.
शिंगणापूर यात्रेत कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शिंगणापूर यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात कावड यात्रा म्हणून ओळखली जाते. शनिवारी द्वादशीच्या दिवशी सकाळपासूनच पुष्कर तलावातील जलतीर्थ घेऊन वाजत-गाजत पायरी मार्गाने आलेल्या जवळपास एक हजारहून अधिक कावडींनी जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. याशिवाय सकाळपासूनच शिंगणापूर यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाटातील कावड सोहळ्याचा थरार रंगला होता.
सकाळी ११ वाजल्यापासून फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यांतील लहान-मोठ्या कावडी मुंगी घाटातून चढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोन वाजल्यापासून सासवड पंचक्रोशीतील सासवड, खळद, शिवरी, बेलसर, एखतपूर, कुंभारवळण आदी ठिकाणच्या मानाच्या कावडी चढविण्यास प्रारंभ झाला. मुंगीघाट डोंगरावरून मानवी हातांची साखळी करून कावडी घेऊन चढविताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.