तीन वर्षांच्या मुलीसह महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

पतीशी वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून भूषणगड (पंतवस्ती) (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
औंध : पतीशी वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून भूषणगड (पंतवस्ती) (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल बुधवारी उघडकीस आली. सीमा रवींद्र येवले (वय ३०), तन्वी रवींद्र येवले (वय ३) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.
याबाबत औंध पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सीमा येवले ही आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडली. भूषणगडच्या पंतवस्तीमधील घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत तिने मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काही वेळानंतर नागरिकांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती औंध पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने मायलेकींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले. पंतवस्तीमधील विहिरीत महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती. पती-पत्नीच्या वारंवार होत असलेल्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मते यांनी सांगितले. याप्रकरणी रवींद्र रामहरी येवले यांनी औंध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे हे अधिक तपास करत आहेत.