डॉ.आंबेडकर जयंतीदिनी सोशल मीडिया जपून वापरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान अवैद्य दारु कुठेही विक्री होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू. जास्तीत जास्त कारवाया करु.
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान अवैद्य दारु कुठेही विक्री होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू. जास्तीत जास्त कारवाया करु. जयंती सोहळ्यापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, यासाठी महावितरणकडे आम्ही पाठपुरावा करु. मिरवणूक मार्गावर वाहतूक कोंडी होणार याची दक्षता घेवू, असे आश्वासित करत सातारचे डीवायएसपी राजीव नवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने सोशल मीडिया जपून वापरा, असे आवाहन केले आहे.
सातारा शिवतेज हॉल येथे सातारा उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातारा शहर पोलीस, शाहुपूरी पोलीस आणि सातारा तालुका पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाईच्या आठवले गटाचे अण्णा वायंदडे, मातंग आघाडीचे किशोरभाऊ गालफाडे, अक्षय कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे, वंचितचे गणेश भिसे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, ऑल इंडिया पँथर सेनेचे आदित्य गायकवाड, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आदी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के म्हणाले, आपल्याला १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करायची आहे. ही जयंती साजरी करताना डिजिटल बोर्ड हे नगरपालिकेची परवाना घेऊनच जमिनीपासून १० फूट उंच असे लावावेत. जो बोर्ड लावेल त्याचीच त्या बोर्डची जबाबदारी असणार आहे. वाहतूक अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूकीसाठी लागणारे स्ट्रकचरही १० बाय १० चे असावे. कोणताही कार्यकर्ता ट्रॅक्टरवर बसणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मिरवणूक रूट पोलिसांना सांगितला पाहिजे. मिरवणूकीवेळी पोलिसांचा बंदोबस्त राहील. साऊंड सिस्टिमसाठी दोन बेस, दोन टॉपची आवाजाची मर्यादा राहिल. रात्री ११.३० पर्यत मिरवणूक बंद केल्या पाहिजेत. गतवर्षी सहकार्य होते, तसेच याहीवर्षी मिळाले पाहिजे. मिरवणूकीत फटाके उडवताना दक्षता घेतली पाहिजे. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत असेल तर त्यावर लक्ष ठेवून त्याची माहिती आम्हाला कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस निरीक्षक तांबे यांनीही कुठेही गालबोट न लागता हा उत्सव साजरा करुयात. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २२ गावात मिरवणुका आहेत. मिरवणूक काळात कोणी दारु पिणार नाही याची दक्षता त्या-त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी विनंती केली.