वडगाव हवेलीतील युवतीची ऑनलाइन फसवणूक
मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दोघांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
कराड : मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दोघांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रगती प्रताप जगताप (रा. वडगाव हवेली) हिने याबाबतची फिर्याद दिली. याप्रकरणी दिन मोहम्मद जाकीर (वय २७, रा. किनगाव, ता. पुन्हाना, जि. नूह, मेवात, हरियाना) व आसिफअली ताहीर हुसेन (वय २२, रा. खानपूर-घाटी, मेवात, हरियाना) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूक प्रकरणात दिन जाकीर आणि आसिफ हुसेन या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील प्रगती जगताप या युवतीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. प्रगती जगताप हिचे जिल्हा बँकेत खाते असून, त्या खात्यावर फेब्रुवारी २०२४ मध्ये एक लाख ३३ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी ४८ हजार रुपये २४ जुलै २०२४ ला प्रगतीच्या खात्यावर जमा झाले.
मात्र, पैसे जमा झाल्याचे प्रगती हिला माहिती नव्हते. दरम्यान, त्याचदिवशी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून प्रगतीला फोन आला. मी तुमच्या वडिलांचे दहा हजार रुपये देणे आहे, असे सांगून ते पैसे मी तुमच्या खात्यात ऑनलाइन पाठवतो, असे त्याने सांगितले. काही वेळात प्रगतीच्या मोबाईलवर १०, २५ आणि २० हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने दूरध्वनी करून चुकून माझ्याकडून जास्त पैसे आले आहेत, तुम्ही माझे ३९ हजार ५०० रुपये परत पाठवा, असे सांगितले.