तडवळेत एकाचा अपघातात मृत्यू

कणसेवाडी (ता. खटाव) येथील एकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तडवळे हद्दीत घडली.
कातरखटाव : कणसेवाडी (ता. खटाव) येथील एकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तडवळे हद्दीत घडली. दत्तात्रय शंकर लवळे (वय ५०) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
दत्तात्रय लवळे हे तडवळे येथील खडी क्रशर मशिनवर काम करत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दुचाकीवरून (एमएच ४३ एजी ४८७) कामावर गेले. सायंकाळी साडेसहा वाजता कामावरून घरी येत असताना दहिवडी- कातरखटाव मार्गावरील तडवळे येथील इनाम ओढा याठिकाणी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
परिसरातील लोकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचा मुलगा विक्रम लवळे यांनी अज्ञात वाहनाविरोधात वडूज पोलिसात फिर्याद दिली आहे.