'हा माझा निर्णय नाही तर...'

महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा मागील काही वर्षांपासून प्रत्येक सीजनला रंगताना पाहायला मिळतात.
मुंबई : महेंद्र सिंह धोनी हा आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा मागील काही वर्षांपासून प्रत्येक सीजनला रंगताना पाहायला मिळतात. मात्र यंदा चेन्नई सुपरकिंग्सचा ढासळत जाणारा परफॉर्मन्स आणि धोनीचं फ्लॉप प्रदर्शन इत्यादी कारणांमुळे धोनी ट्रोल होतोय. तसेच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवानंतर एमएस धोनीचं यंदा शेवटचं सीजन असून तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार याची पुन्हा एकदा चर्चा आता जोर धरू लागलीये. मात्र आता यावर एम एस धोनीने स्वतः खुलासा केला आहे. राज शमानीने त्याच्या पॉडकास्टवर एम एस धोनीला आमंत्रित केले होते.
एम एस धोनीने पॉडकास्टवर राज शमानीने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. या पॉडकास्टमध्ये धोनीने सांगितले की तो क्रीडा कारकीर्द सुरू ठेवण्याबाबत तो घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाही. आयपीएलचा 18 वा सीजन मे मध्ये संपल्यावर तो पुढील 10 महिन्यात हे ठरवू इच्छितो की त्याला पुढील वर्षी काय करायचं आहे. धोनीने म्हटले की, 'मी आताही आयपीएलमध्ये खेळतोय आणि एका वर्षात फक्त एकदाच खेळतोय. मी 43 वर्षांचा आहे आणि आयपीएल सीजन संपेपर्यंत मी 44 वर्षांचा होईन. मग माझ्याकडे हे ठरवण्यासाठी 10 महिने असतील की मी एक वर्ष अजून खेळू इच्छितो की नाही, पण हा माझा निर्णय नसेल. मी खेळू शकतोस की नाही हे माझ्या शरीरावर अवलंबून आहे'.
आयपीएल 2025 हंगामाच्या सुरूवातीपासूनच, धोनीने त्याची विकेटकीपिंग क्षमता आणि तंदुरुस्तीसह प्रत्येकावर प्रभाव पाडला आहे. धोनीचा मेंदू पूर्वीसारखा वेगवान आहे आणि त्याच्या प्रतिक्षेपात कोणतीही घट झालेली नाही. पण धोनी फलंदाजीमध्ये संघर्ष करीत आहे. दिल्ली कॅपिटलविरुद्धच्या सामन्यात धोनी केवळ 26 चेंडूंमध्ये 30 धावा करू शकला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जला 50 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सीएसकेला 4 सामन्यांपैकी केवळ 1 सामना जिंकणे शक्य झाले. सध्या चेन्नई सुपरकिंग्स पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.