सातारा-मुंबई महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणखी १९ कॅमेरे

सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सातारा : सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी महामार्गावर नव्याने १९ ठिकाणी ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांच्या सुसाट वाहनांमुळे अनेकदा अपघातांना निमंत्रण दिले जाते. त्यासाठी प्रशासनाने वाहनांच्या वेगमर्यादेचे बंधन घालून दिले आहे. मात्र, नियमांचे पालन न केल्यास अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी सातारा ते मुंबई या मार्गावर कॅमेरे बसविण्यात आले. मात्र तरीही अपघाताचे प्रमाण जैसे थे होते. त्यामुळे वाढत्या अपघाताबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व्हे करण्यात आला होता.
त्यानुसार अपघातांच्या ठिकाणी नव्याने १९ स्पीड लिमिटचे कॅमेरे बसविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. दरम्यान, सातारा ते वाकड व त्यानंतर एक्स्प्रेसवेवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने खासगी वाहनांसह शासकीय वाहनांवरही भरमसाट दंड आकारला आहे. या ओव्हरस्पीडमध्ये ‘एसटी’चाही समावेश आहे. त्यामुळे नव्याने बसविलेल्या कॅमेऱ्यांच्या ठिकाणांचे पत्रही एसटी विभागाला पाठविले आहे.
कात्रज बोगद्यापासून ५०० मीटर अंतरावर, नरे व नवले पुलापासून एक किलोमीटरवर, वारजे ब्रीजच्या अलीकडे पाचशे मीटरवर, एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर ५०० मीटर, शिरगाव गावापासून पुढे तीन किलोमीटर, ऊर्से गुरुवामन पुलापासून एक किलोमीटर, बाऊर पुलाच्या अलीकडे १०० मीटर व पुढे २०० मीटर, बोरज पुलाच्या अलीकडे शंभर मीटर, मळवली पुलाच्या पुढे पाचशे मीटर, सिंहगड कॉलेजच्या पुढे ५०० मीटर, लोणावळा जुना हायवे टोलनाक्याजवळ, लोणावळा जुना हायवे पूल संपताना, कुणेगाव पुलाजवळ, खंडाळा जुन्या बोगद्याजवळ ५०० मीटर अलीकडे, जुना एस कॉर्नर पुलाच्या अलीकडे, मारुती मंदिराजवळ घाटात, आडोशी बोगद्याच्या अलीकडे 500 मीटर.
सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी महामार्गावर सर्व्हे करण्यात आला होता. प्रशासनाने वाहनचालकांना घालून दिलेल्या वेगमर्यादेचे बंधन न पाळल्यास स्पीड कॅमेऱ्याच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईस सामोर जावे लागणार आहे.
- संदीप म्हेत्रे,
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी