अनुष्का उद्योगाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

पुणेस्थित अनुष्का महिला गणेश उद्योग संचलित फलटण शाखेने हजारो महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप आज करण्यात आला.
सांगवी : पुणेस्थित अनुष्का महिला गणेश उद्योग संचलित फलटण शाखेने हजारो महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप आज करण्यात आला. फलटण व परिसरातील संबंधित महिलांनी येथील शाखेसमोर एकत्र येत निदर्शनेही केली. अनुष्का महिला गणेश उद्योग संचलित फलटण शाखेने पेन्सिल बनविण्यासाठी उद्योग सुरू केला होता.
यामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा संलग्न होण्यासाठी प्रत्येक महिलेकडून दोन हजार रुपयांची गुंतवणूक/नोंदणी फी आकारली गेली होती. दरम्यान, या उद्योगातून अर्थार्जनासाठी हजारो महिलांनी आपला समभाग नोंदवला होता. त्या महिलांच्या माध्यमातून पुढे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित संस्थेने या महिलांकडून पैसे घेतले होते असा आरोप या महिलांनी केला आहे.
फलटणच्या बुधवार पेठेतील रचना अपार्टमेंटमध्ये अनुष्का लघु गृह उद्योगाच्या शाखेचे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या संस्थेमार्फत महिलांना नोंदणी करणे बंधनकारक होते, तसेच नोंदणीसाठी दोन हजार रुपये भरावे लागत होते. अंदाजे एक हजारहून अधिक महिलांनी या संस्थेत प्रवेश नोंदणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. अनुष्का लघु गृहउद्योग या संस्थेमार्फत संस्थेतील नोंदणीकृत महिलांना पेन्सिल बॉक्स बनवण्याच्या प्रकारचे घरगुती उद्योग दिले जायचे. या महिलेस दिवसाला दोनशे रुपये प्रमाणे रोजगार मिळेल, अशी माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, या महिलांचा विश्वास संपादन करून संबंधित उद्योग समूहाने मोठ्या प्रमाणावर फलटण तालुक्यात नोंदणी केली होती. अशा प्रकारे अनेक महिलांनी रोजगारासाठी या संस्थेत नोंदणी करून रक्कम जमा केली होती, असे उपस्थित महिलांनी सांगितले.
या प्रकाराबाबत फलटण शहर पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू केली आहे, असे फसवणुकीचा प्रकार घडल्याने सर्वसामान्य महिलांचे गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी या आर्थिक पीडित महिलांनी केली असून, या घटनेने फलटणसह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.