श्री शनैश्वर देवस्थान सोळशी येथे शनी अमावास्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी

तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यामार्फत शनि अमावस्या निमित्ताने श्री शनैश्वरास 52 पात्री लघु रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला.
सातारा : तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यामार्फत शनि अमावस्या निमित्ताने श्री शनैश्वरास 52 पात्री लघु रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शनी भक्तांच्या उपस्थितीत श्री शनि देवास रुद्राभिषेक तसेच नवग्रह शांती होम हवन पठण करण्यात आले.
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमही नेहमीच राबविले जातात. यावर्षी श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट जोशी आणि नंदादीप किडनी यूरोलॉजी हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुत्ररोग निदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत निदान व उपचार होणार असून प्रोटेस्ट ग्रंथीचा आजार, मुतखडा (किडनीस्टोन), किडनीशी संबंधित आजार, मूत्रमार्गातील प्लास्टिक सर्जरी, विविध विकार, तसेच अन्य मूत्ररोगांवर मोफत तपासणी करण्यात आली. या शिवाय व्हेरिकोज व्हेन, हार्निया यांसारख्या आजारांवर या शिबिरात सुप्रसिद्ध डॉ. तन्मय शेटे यूरोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्वाचा एक आदर्श घालून दिला.
मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी समाज प्रबोधन पर मार्गदर्शन केले. कर्मफल दाता शनि देव यांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. दुपारी श्री शनि देवाच्या आरतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्यानंतर पारंपारिक प्रथेनुसार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.