वाईत पाण्यामध्ये दहीहंडीचा थरार

सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दक्षिण काशी वाईत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात झाला.
वाई : सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दक्षिण काशी वाईत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात झाला. परंपरेनुसार गोविंदा आला रे आला असा जयघोष करत सिद्धनाथवाडी येथील सिद्धेश्वर गोविंदा पथकाने शहरातील अनेक दही हंड्या फोडल्या. यामुळे शहरातील वातावरण मंगलमय झाले होते.
शहरात ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सोनगीरवाडी येथे शिवाजी चौकात माजी उपसभापती विक्रम डोंगरे मित्र परिवाराने मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६५ हजार रुपयांची दहीहंडी बांधली होती. सिद्धनाथवाडी येथे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या स्मरणार्थ दहीहंडी बांधण्यात आली होती. नवीन कृष्ण पुलानजीक शिवसेना एकनाथ शिंदे गटामार्फत विकास शिंदे यांनी, तर शिवसेना युवा सेनेच्या वतीने अध्यक्ष योगेश फाळके यांनी महागणपती पुलाजवळ शासकीय योजनाची जनजागृती करणारी दहीहंडी बांधली होती.
याशिवाय महात्मा फुले मंडई, शाहीर चौक (गंगापुरी), शिवस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ, (रविवार पेठ), ब्राह्मणशाही चौक येथेही दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धनाथवाडी, सोनगीरवाडी, गणपती आळी, धर्मपुरी भागातील विविध ठिकाणची दहीहंडी फोडून सिद्धनाथवाडीतील गोविंदा पथकाने अनेक ठिकाणी इनाम पटकाविले. रविवार पेठ व गंगापुरी भागातील दहीहंड्या स्थानिक गोविंदा पथकांनी फोडल्या.
किसन वीर चौकातील शेवटची मानाची दहीहंडी रात्री उशिरा सिद्धेश्वर गोविंदा पथकाने फोडली. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बंदी असतानाही गोविंदा पथकांनी ध्वनिवर्धकाच्या भिंतींच्या तालावर दहीहंडी फोडल्या.
पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम, पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक सुधीर वाळूंज, अमित सुर्वे व सहकारी पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
रविवार पेठ येथील संत रोहिदास मंडळाने किवरा ओढ्यात बांधलेली पाण्यातील दहीहंडी रविवार पेठ गोविंदा पथकाने पाच थर लावून फोडली. उद्योजक अमित भगत यांनी ११ हजार १११ रुपयाचे बक्षीस दिले. ओंकार, तसेच प्राजक्ता सकटे यांनी गोविंदा पथकाला मानचिन्ह दिले. या वेळी परिसरातील आबालवृद्धांनी दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.