'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न
सातारा शहरातील महामार्गालगत 'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडणार्या पुणे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला.
सातारा : सातारा शहरातील महामार्गालगत 'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडणार्या पुणे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला. चोरट्याने नागरिकांवर हल्ला चढवल्यानंतर रहिवासी असलेला जवान जखमी झाला असून नागरिक एकत्र जमल्यानंतर चोरट्याला चांगलाच चोप दिला.
वेदांत शांताराम अरोडे (वय २३) असे इमारतीवरुन पडून ठार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५, दोघे रा. मंचर जि.पुणे) असे जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे. तसेच घटनेनंतर एक चेारटा पळून गेला आहे. या प्रकरणी प्रकाश बाबूराव घार्गे (वय ५२, रा. वास्तू प्लाझा, पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे वास्तू प्लाझा या इमारतीमध्ये घुसले. त्यातील एकजण खालीच थांबून होता तर दोघेजण इमारतीमध्ये गेले होते. चोरट्यांनी सर्व फ्लॅटच्या दरवाजांची कडी बाहेरुन घातली. बंद फ्लॅटमधील विकास जगदाळे यांचा फ्लॅट फाेडून घरातून रोख ५५०० रुपये चोरले. तसेच निलेश काटकर यांचा बंद फ्लॅट फोडून घरातून ६ लाख रुपये किंमतीचे ६ तोळ्याचे सोने चोरले. चोरटे चोरी करत असल्याचे तक्रारदार घार्गे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र घराला बाहेरुन कडी घातली होती. त्यांनी इमारतीमधील इतरांना फोन करुन चोरटे इमारतीमध्ये घुसले असल्याचे सांगितले.
वास्तू प्लाझा या इमारतीमध्ये वैभव गजानन जाधव हे जवान राहत आहेत. चोरटे इमारतीमध्ये आल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी घराबाहेर लावलेली कडी काढून घेतली. वैभव जाधव बाहेर आल्यानंतर त्यांनी इतर फ्लॅटधारकांच्या बाहेरील कड्या काढण्यास सुरुवात केली. यामुळे नागरिक बाहेर आले व त्यांनी चोरट्यांना पकडले.
चोरीच्या या थरारक घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी एका चोरट्याला पकडून ठेवले होते. दुसरीकडे इमारीच्या वर टेरेसवर गेलेला चोरटा पाईपवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना तो थेट वरुन खाली जमिनीवर पडला. जोरदार पडल्याचा आवाज झाल्याने नागरिकांची आणखी घाबरगुंडी उडाली. खाली येवून काही जणांनी पाहिले असता चोरटा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याला ताब्यात घेतले. मृत पडलेल्या चोरट्याजवळ पोलिसांनी थांबून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. जखमी चोरट्याने मृत चोरटा साथीदार असल्याची कबुली दिली. तसेच आणखी एक साथीदार पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा केला.