महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला

मागील चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी घडत आहेत.
महाबळेश्वर : मागील चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी घडत आहेत. त्यात आज भिलार येथील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब भिंत कोसळली. सुदैवानाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, की भिलार परिसरात संततधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले आहेत. या पावसात भिलार जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीतील केंद्र प्रमुख कार्यालयाचे स्लॅब व भिंत कोसळली आहे.
सुदैवाने कोणत्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नाही. आज सकाळी महसूल विभागाच्या वतीने या नुकसानीचा पंचनामा केला असून, यामध्ये अंदाजे १० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य प्रवीण भिलारे,
नायब तहसीलदार दीपक सोनवणे, सरपंच शिवाजीराव भिलारे, केंद्रप्रमुख सुरेंद्र भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण, कृषी सहाय्यक जगताप, संतोष धनावडे, पोलिस पाटील रूपाली कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.