कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर आज मंदावला. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याची आवक कमी झाली नसल्याने काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर ठेवले आहेत.
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर आज मंदावला. मात्र, दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याची आवक कमी झाली नसल्याने काल रात्रीपासून धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर ठेवले आहेत. सध्या सांडव्यावरून ९३ हजार २००, पायथा वीजगृहातून दोन हजार १०० असा एकूण ९५ हजार ३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. मूळगाव, नेरळे, निसरे पूल आजही पाण्याखाली आहेत.
आज पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तूर्तास धोका टळला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाने उघडीप घेतल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत काहीशी घट झाली. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १६८ (३९६१) मिलिमीटर, नवजाला २२३ (४८६६) मिलिमीटरआणि महाबळेश्वरला २७६ (४५६१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जलाशयात प्रतिसेकंद एक लाख ११ हजार १६६ क्युसेक पाण्याची आवक होत असून, २४ तासांत ९.६० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा १०१.४६ टीएमसी झाला आहे.