प्रभाकर देशमुखांच्या घरी पोलीस आल्याबबत मंत्री जयकुमार गोरेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे : भाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस दाखल झाले असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तब्बल तीन तास सातारा पोलीसांकडून देशमुख यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी पकडले होते. या महिलेला पोलिसांनी रक्कम स्वीकारताना पकडून अटक केली. पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील प्रभाकर देशमुख यांच्या घरी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांची चौकशी सातारा पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरून रवाना झाले आहेत. यामुळे आता या प्रकरण कोणती नवी माहिती येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. गोरे बोलताना म्हणाले, त्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलीस तपास सुरू आहे. त्याबाबत बोलण्याविषयी माझ्याकडे खूप काही आहे पण मी आता बोलणार नाही. अजून तपास सुरू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. त्यामध्ये जे काही आहे ते बाहेर येऊ द्या ते बाहेर आल्यानंतर मी त्या संदर्भात भूमिका मांडेल. आज पोलीस तपास सुरू आहे, त्यांना तपास करू द्या., असंही ते पुढे म्हणालेत.
पोलिस प्रभाकर देशमुख यांची चौकशी करणार आहेत, याबाबत पत्रकारांनी मंत्री जयकुमार गोरे यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे. मात्र, पोलिस तपास सुरू असल्याने मी काही बोलणार नाही, असे गोरे म्हणाले.