‘भारत की बात’ करणारे ‘भारत कुमार’ निवर्तले

‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले.
मुंबई : ‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, शशी व कुणाल ही दोन मुले, असा परिवार आहे.
पाकिस्तानात असलेल्या अबोटाबाद येथे १९३७ मध्ये मनोज कुमार यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत आले. मनोज कुमार यांना बालपणापासूनच चित्रपटांची आवड होती. बालपणी त्यांनी दिलीप कुमार यांचे ‘शहीद’सह इतरही काही चित्रपट पाहिले. दिलीप कुमार यांच्या ‘शबनम’मधील ‘मनोज’ हे नाव त्यांनी घेतले.
दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव
‘पूरब और पश्चिम’, ‘शहीद’, ‘क्रांती’, ‘उपकार’ आदी देशभक्तीपर चित्रपटांसोबतच त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये काम केले. ‘शहीद’मध्ये त्यांनी साकारलेल्या भगतसिंग यांचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कौतुक केले.
१९६१मध्ये प्रदर्शित ‘कांच की गुडिया’ चित्रपटामध्ये ते प्रथमच मुख्य भूमिकेत दिसले. त्यांचे ‘रोटी कपडा और मकान’, ‘वह कौन थी’, ‘शोर’, ‘हरियाली और रास्ता’, ‘गुमनाम’, ‘शादी’, ‘पत्थर के सनम’, ‘सावन की घटा’, ‘शिर्डी के साईबाबा’ आदी चित्रपट गाजले.
‘सहारा’, ‘चांद’, ‘हनीमून’, ‘पिया मिलन की आस’, ‘सुहाग सिंदूर’, ‘रेशमी रुमाल’, ‘डॉ. विद्या’, ‘गृहस्थी’ आदी चित्रपटांतील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मनोज यांना १९९२मध्ये पद्मश्री, तर २०१५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- जिंदगी की ना टुटे लडी.../५