दिवाळी सण काही दिवसांवर आल्याने खासगी, सरकारी सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. व्यापारी, नागरिक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये आले आहेत. दिवाळीला मोठा खर्च केला जातो. लोकांचा बोनस आणि पगारही बँकांमध्ये जमा झालेला आहे. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे. अशातच बँका दिवाळी सुट्टीमुळे काही दिवस बंद असणार आहेत.
मुंबई : दिवाळी सण काही दिवसांवर आल्याने खासगी, सरकारी सर्वच बँकांमध्ये मोठी गर्दी उसळली आहे. व्यापारी, नागरिक पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँकांमध्ये आले आहेत. दिवाळीला मोठा खर्च केला जातो. लोकांचा बोनस आणि पगारही बँकांमध्ये जमा झालेला आहे. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाणार आहे. अशातच बँका दिवाळी सुट्टीमुळे काही दिवस बंद असणार आहेत.
बँका बंद राहणार असल्याने अनेकांची भिस्त युपीआय, एटीएमवर राहणार आहे. काही राज्यांमध्ये ३१ ऑक्टोबर तर काही राज्यांत १ नोव्हेंबरला सुट्टी देण्यात आली आहे. दिवाळी २८ तारखेपासून सुरु होत आहे. या दिवशी वसूबारस असून २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी असणार आहे. ३१ तारखेला नरक चतुर्दशी आहे. या तिन्ही दिवशी महाराष्ट्रात बँका बंद नसणार आहेत.
तर महाराष्ट्रातील बँका १ नोव्हेंबर, २ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर(रविवार) अशा सलग तीन दिवस बंद असणार आहेत. ३१ ऑक्टोबरला दक्षिण भारतातील तसेच उत्तर भारतातील बँकांना सुट्टी आहे. तर इतर राज्यांत १ ते ३ नोव्हेंबर सुट्टी देण्यात आली आहे.
यंदाची दिवाळी सव्वा चार लाख कोटींची...
यंदा दिवाळीच्या निमित्ताने देशभरात बाजारात तब्बल ४.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्त केला. ऑक्टोबरअखेरीस दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जाईल. घरे तसेच मंडपाची सजावट, दीपमाळा, पूजेचे साहित्य, फुले-फळे, दागिने तसेच खाद्यपदार्थांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असतो. यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळते.