भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम, शिंदे गट शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना पर्यटन, खाण, सैनिक कल्याण मंत्रालय खाते, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा अधिभार देण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व सातारा जिल्ह्याला प्रत्येकी चार मंत्री पदे बहाल केली आहेत. यामध्ये पुण्याच्या तुलनेमध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद जादा सातारा जिल्ह्याला देण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची मजबूत मोर्चे बांधणी आणि राजकीय समीकरणे टिकवण्याचा हा एक प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार करताना सुद्धा साताऱ्याला झुकते माप देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी साताऱ्यात भव्य आगमन होत असून त्याच्या पूर्वसंध्येलाच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पाटणचे आमदार शंभूराज यांना गत पंचवार्षिकप्रमाणे उत्पादन शुल्क खाते दिले जाईल, असा अंदाज होता. मात्र शंभूराज यांना पर्यटन, सैनिक कल्याण दिले आहे. राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन, आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे.
या खाते वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा ठेवण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यश मिळवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करत गृह मंत्रालयाच्या बदल्यात त्यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. तसेच त्यांचे पारंपारिक नगर विकास खाते कायम ठेवण्यात आले आहे. एकंदर मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता सातारा जिल्ह्याला पाच कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा वेगळीच राहणार आहे.
सातारा जिल्हा हा डोंगरी आणि पूरग्रस्त असल्याने खातेवाटप विस्तारामध्ये मदत व पुनर्वसन राष्ट्रवादीच्या वाट्याला देण्यात आले. पर्यटन विस्ताराच्या दृष्टीने सुद्धा अनुभवी कॅबिनेट नेतृत्वाची गरज होती. तो अधिकार शंभूराज यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पाटण व महाबळेश्वर येथील विकास प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने ग्रामविकास मंत्रालय तसेच तेथील राजकीय समीकरणे मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने जयकुमार गोरे यांना ग्राम विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने ग्रामविकास मंत्रालयाची ही आमदार गोरे यांना देण्यात आलेली जबाबदारी भाजपला फायद्याची ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आला आहे. या खातेवाटपाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील चारही आमदारांचे नेतृत्व तसेच कॅबिनेट मंत्री या नात्याने त्यांच्या कामाचे प्रगती पुस्तक पुढील अडीच वर्षासाठी तपासले जाणार आहे.