कोयनानगर विभागातील रासाटी येथून पाऊलवाटेने नानेल या आपल्या गावाला जाणार्या एकनाथ जाधव या शेतमजुरावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गव्याने पोटात शिंग खुपसल्याने एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली.
पाटण : कोयनानगर विभागातील रासाटी येथून पाऊलवाटेने नानेल या आपल्या गावाला जाणार्या एकनाथ जाधव या शेतमजुरावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गव्याने पोटात शिंग खुपसल्याने एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली. गुरुवार दि. 19 रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. दरम्यान, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
कोयना विभागातील दुर्गम ठिकाणी असणार्या नानेल गावाला जाण्यासाठी रासाटी येथून असणार्या पायवाटेवरुन एकनाथ जाधव (वय 50) हे निघाले होते. बुधवार दि. 18 रोजी रात्री या शेतमजुरावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात एकनाथ जाधव यांच्या पोटात शिंग खुपसल्याने ते गंभीर जखमी होवून त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत एकनाथ जाधव यांच्या घरातील नातेवाईकांनी जाधव यांचा दिवसभर शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. गुरूवार दि. 19 रोजी रात्रीच्या सुमारास त्याच पायवाटेवर जाणार्या नागरिकांना एकनाथ जाधव याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. रात्री उशिरा मृतदेह पाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथे मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद कोयना पोलिसांत झाली आहे.