सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक ढवळून निघालं आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच असणाऱ्या देशमुख यांची सात आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक ढवळून निघालं आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच असणाऱ्या देशमुख यांची सात आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली. या हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अजूनही फरार आहे. तसंच पोलीस प्रशासन आणि राजकीय व्यक्तींकडून खतपाणी घालण्यात आल्यानेच आरोपींची हत्या करण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २१ डिसेंबर रोजी मस्साजोग इथं जाऊन दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असल्याचे समजते.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांच्या आत्येभावाने दिलेल्या तक्रारीनंतरही पोलिसांनी तब्बल तीन तास गुन्हा नोंद केला नाही. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. हत्येची बातमी आल्यानंतर पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंद केला. राजकीय दबावामुळेच पोलिसांनी ही दिरंगाई केल्याचा आरोप देशमुख यांच्या नातेवाईकांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. आरोप करणाऱ्यांच्या रोख हा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर असल्याचं पाहायला मिळतं. तसंच या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करून आरोपींना मदत करणारे पोलीस आणि राजकीय पक्षाशी संबंधित लोकांचाही हत्येच्या गुन्ह्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार मस्साजोगला जाणार असल्याने तेथून पवार नक्की काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कट रचणाऱ्या आरोपीला अटक
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत. विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. तसंच पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिवेशनात प्रकरण गाजले
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी अधिवेशनात सत्ताधारी, विरोधकांनी आवाज उठवला. या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधण्यासह आरोपींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव घेत अटकेची मागणी केली. अधिवेशन संपेपर्यंत कराड यांना अटक झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात बाजू मांडली आहे. या गंभीर प्रकरणात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आता पोलिसांवरही या सर्व प्रकरणाचा दबाव राहणार असल्याचे दिसते.