दिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सातारा : दिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने या गुन्ह्याची उकल केवळ बारा तासात करून एका महिलेस अटक केली आहे. महिलेकडून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैशाली रामदास ढेपे रा. परळी, ता. सातारा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. 19 डिसेंबर रोजी तक्रारदार डॉ. मुराद आलम मुलाणी रा. परळी, ता. सातारा यांनी मुलाच्या शिक्षणासाठी क्लिनिकच्या वरील घरात असलेल्या बेडरूम मधील कपाटात ठेवलेले त्यांचे दहा लाख दहा हजार रुपये घरफोडी करून अज्ञाताने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला दिल्या होत्या. पथकाने या आरोपीची गोपनीय माहिती मिळवून एका संशयित महिलेस परळी, ता. सातारा येथून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ही महिला मुलाणी यांच्या घराची साफसफाई करण्यासाठी येत असते. तसेच तिने त्यांच्या घरातून तीन लाख दहा हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. यानंतर तिच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम ताब्यात घेऊन तिला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय अधिकारी राजीव नवले सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, सहाय्यक फौजदार वायदंडे, पोलीस हवालदार संदीप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, महिला पोलीस हवालदार मंडले, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, शिवाजी डफळे यांनी सहभाग घेतला.