सातार्यातील सुप्रसिद्ध कंदी पेढ्यांचे व मिठाई व्यापारी भरत शेठ राऊत हे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जागतिक दर्जाच्या कंदी पेढ्याने तुला करणार आहेत.
सातारा : सातार्यातील सुप्रसिद्ध कंदी पेढ्यांचे व मिठाई व्यापारी भरत शेठ राऊत हे अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जागतिक दर्जाच्या कंदी पेढ्याने तुला करणार आहेत. 2004 मध्ये आमदारकीच्या पहिल्या टर्मला शिवेंद्रसिंहराजे यांची सातार्यातील पहिली पेढ्यांची तुला भरत शेठ यांनीच केली होती. त्यावेळी कॅबिनेट मंत्री झाल्यास तुमची पेढे तुला पुन्हा करू, असा शब्द दिला होता. ती वचनपूर्ती आता वीस वर्षांनी होत आहे. त्यावेळेसही मीच पहिली पेढे तुला केली होती आणि आज शिवेंद्रसिंहराजे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांची पहिली पेढे तुला मीच करीत आहे, या घटनेचा मला विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया भरत शेठ राऊत यांनी याबाबत बोलताना दिली आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे रविवारी शपथविधीनंतर पहिल्यांदाच सातार्यात येत आहेत. त्यानिमित्ताने बाबाराजे समर्थकांनी सातार्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या जंगी स्वागताची तयारी केली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच त्यांचे वडील स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्याशी गेली अनेक दशके घनिष्ट संबंध असलेले सातारचे सुप्रसिद्ध मिठाई व्यापारी भरत शेठ राऊत हे प्रत्येक निवडणुकीच्या विजय सोहळ्यात पेढ्यांचा वर्षाव भाऊसाहेब महाराज यांच्यावर आणि त्यांनी त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर करीत होते. तसा त्यांनी पायंडाच पाडला होता. आता भरत शेठ राऊत यांनी यावेळीही आगळावेगळ्या स्वागताची तयारी केली आहे.
बाबाराजे समर्थकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते अजिंक्यतारा कारखाना यादरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जंगी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले आहे. कारखाना कार्यस्थळावर भाऊसाहेब महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यानंतर भरत शेठ यांच्या संकल्पनेतून कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची पेढे तुला केली जाणार आहे. त्याकरता भरत शेठ यांनी कारखाना कार्यस्थळावर फुलांनी सजवलेला तराजू सज्ज ठेवला आहे. या तुलेच्या निमित्ताने भरतशेठ राऊत हे येथील कार्यकर्त्यांना तुला झाल्यानंतर तब्बल सव्वाशे किलो पेढे वाटून कार्यकर्त्यांचे तोंड गोड करणार आहेत.
या विशेष अभिनंदनाबाबत भरत शेठ राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमचे व राजघराण्याचे गेले सहा दशकांचे संबंध आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील व मार्गदर्शक स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले असता त्यांची सातार्यातून मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा भरतशेठ राऊत यांनी त्यांच्या ऍम्बेसिडर गाडीमध्ये पाच पराती पेढ्यांची उधळण केली होती. भाऊसाहेब महाराजांच्या या आगळ्यावेगळ्या स्वागताची तेव्हाही चर्चा झाली होती. तोच योगायोग आता शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकाळातील वीस वर्षानंतर जुळून येत आहे.कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भरत शेठ राऊत यांच्या प्रयत्नातून शिवेंद्रसिंहराजे यांची पेढे तुला होत आहे, ही आमच्याकडून अभिनंदनाची पद्धत आहे. बाबाराजे यांनी सातारा जिल्ह्याचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी खास अपेक्षा भरत शेठ राऊत यांनी व्यक्त केली आहे.