आता लवकरच भारतीय नागरिक व्हिसाशिवाय रशियाला भेट देऊ शकतील. 2025 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात याबाबत करार होवू शकतो.
नवी दिल्ली: आता लवकरच भारतीय नागरिक व्हिसाशिवाय रशियाला भेट देऊ शकतील. 2025 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात याबाबत करार होवू शकतो. यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी भारत आणि रशियाने व्हिसा मुक्त प्रवासासाठी एकमेकांच्या व्हिसा निर्बंध कमी करण्यासाठी द्विपक्षीय करारावर चर्चा केल्याचे वृत्त आले होते.
व्हिसा-मुक्त गट पर्यटन एक्सचेंज सुरू करण्याची योजना
मॉस्को शहर पर्यटन समितीचे अध्यक्ष इव्हगेनी कोझलोव्ह यांनी सांगिलते की, “आता विकासाधीन असलेल्या करारामुळे भारतातून रशियन राजधानीत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. रशिया आणि भारताने जूनमध्ये व्हिसा निर्बंधांबाबत द्विपक्षीय करारावर चर्चा झाली होती.एकत्रितपणे व्हिसा-मुक्त गट पर्यटन एक्सचेंज सुरू करण्याची योजना आखली असल्याचेही 'पीटीआय'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
रशियाने ई-व्हिसा जारी केलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारत
रशियाने ऑगस्ट 2023 पासून भारतीयांसाठी ई-व्हिसा सुरू केला, ज्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 दिवस लागतात. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी रशियाने जारी केलेल्या ई-व्हिसाच्या संख्येत भारत पहिल्या पाच देशांमध्ये होता. रशियाने भारतीयांना 9,500 ई-व्हिसा दिले आहेत. हे आकडेवारी रशियाने जारी केलेल्या एकूण ई-व्हिसापैकी 6 टक्के आहे.
भारतीयांचे रशियाला प्राधान्य
“2023 मध्ये भारतातून 60,000 हून अधिक नागरिकांनी रशियाची राजधानी मास्कोला भेट दिली.2022 मधील आकडेवारीपेक्षा ही टक्केवारी २६ ने अधिक आहे. सध्या रशिया आपल्या व्हिसा फ्री टुरिस्ट एक्सचेंज अंतर्गत चीन आणि इराणमधील प्रवाशांना व्हिसा मोफत प्रवेश देत आहे. रशियाचे चीन आणि इराणसोबतचे सहकार्य यशस्वी ठरले आहे, हे लक्षात घेता भारतासोबतही अशीच यंत्रणा सुरू होईल, असे मानले जात आहे.
सध्या भारतीयांना ६२ देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाचा
सध्या भारतीय पासपोर्टधारकांना 62 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा पासपोर्ट 82 व्या क्रमांकावर आहे. यामुळे भारतीय नागरिक इंडोनेशिया, मालदीव आणि थायलंड देशातील पर्यटन स्थळांना व्हिसाशिवाय भेट देवू शकतात.