उंब्रज येथुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लाय ओव्हर बनविणेत यावा
सातारा : उंब्रज येथुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लाय ओव्हर बनविणेत यावा, या ठिकाणी सेवा रस्त्यावर ड्रॉप ऍन्ड पिकअप पॉईट करावा, नागठाणे येथे फ्लायओव्हरच्या खाली प्रस्तावित असणारा अंडरपास मोठा करावा, वाहतूक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या कामांना सर्वोच्य प्राधान्य देत कार्यवाही करावी, अशी मागणी आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांचेकडे केली
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री श्री नितीन गडकरी यांचे निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेत, त्यांच्याशी जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भात चर्चा केली.
त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आवर्जुन नमुद करताना प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे की, सातारा जिल्हयातील आणि कराड तालुक्यातील उंब्रज हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव आहे. याठिकाणी दोन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गास छेदत असून, जिल्ह्यातील झपाट्याने विकसित होणारे गाव म्हणून उंब्रज कडे पाहिले जाते. कृष्णा, तारळी व मांड नद्या सुध्दा या गावातून वहात आहेत. साधारण 45,000 लोकसंख्या असणार्या उंब्रज येथे सुमारे 20 वर्षापुर्वी भराव पद्धतीचा फ्लायओव्हर बनविला आहे. त्यामुळे उंब्रज गावच्या ग्रामस्थांच्या व्यावसायिक आर्थिक उन्नतीवर विपरित परिणाम झाला आहे. उंब्रज ग्रामस्थांनी आमच्याकडे वेळोवेळी भराव पदधतीचा फ्लायओव्हर ऐवजी सेगमेंट अर्थात पारदर्शक पुल करण्यासंबंधी मागणी केली होती. तसेच नागठाणे येथे फ्लायओव्हर बरोबर मोठा अंडरपास बांधण्याबाबत मागणी केली आहे. नागठाणे हे देखिल एक व्यापारी गांव म्हणून नावारुपाला आलेले आहे. नागठाणे पंचक्रोशीसह पाडळी, निनाम अश्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा राष्ट्रीय महामार्गाशी दररोज संबंध येत असतो. त्यामुळे नागरीकांची गरज आणि समाजाचे हित लक्षात घेवून ही कामे मार्गी लावावीत
तसेच सातार्याकडून पुण्याला जाताना, पारगांव खंडाळा आणि शिरवळ या ठिकाणी असणारे सेवारस्ते रुंद करणे आवश्यक आहे. येथील एमआयडीसी- पंढरपूर कडे जाणार्या वाहनांना मोठी कसरत करावी लागतेच. तथापि ते जास्त गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन फ्लायओव्हर करावा. या ठिकाणी आत्ताच्या सेवा रस्त्यांच्या नियमानुसार रुंदीकरण करण्यात येवून, पारगांव खंडाळा आणि शिरवळ येथे ड्रॉप ऍन्ड पिकअप पॉईट शेडसह निर्माण करावेत. जेणेकरुन वळणार्या वाहतुकीला सोयीचे होवून महामार्गावरील वाहतुकीलाही कोणताही अडथळा न होता, वाहनधारकांची मोठी सोय हाईल. म्हणूनच ही प्रस्तावित केलेली कामे हाती घेण्यात यावी, अशी आग्रही विनंती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.
केंद्रातील हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणार्या आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचेशी घनिष्ठ संबंध असणार्या ना. नितिन गडकरी यांनी जागेवरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रजनीश कपूर यांना बोलावले आणि आता उंब्रज येथील सुरु असलेल्या कामामधुन उंब्रज येथील पारदर्शी नवीन पूल उभारण्याबाबाबत कार्यवाही करावी, अश्या सूचना दिल्या. तसेच याकरीता लागणारा निधी मंजूर करण्याचे अभिवचन खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.
त्याचप्रमाणे पारगांव-खंडाळा, शिरवळ येथील फ्लायओव्हर, सेवा रस्ता, पिकअप आणि ड्रॉप पॉईंट तसेच नागठाणे येथील अंडरपास बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशू मलिक, श्रीवास्तव, पुणे व कोल्हापूर येथील महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम व वसंत पंधारकर यांच्या समवेत विशेष बैठक घेवून सदरचे प्रश्न मार्गी लावले जातील, असेही ना. नितिन गडकरी यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आश्वासित केले.
यावेळी ना. गडकरी यांचे सहाय्यक दिपक शिंदे, अमोल बिराजदार, यांच्यासह काका धुमाळ, ऍड. विनित पाटील, दिल्लीतील स्वीय सहाय्यक करण यादव उपस्थित होते.
दरम्यान, उंब्रज येथील भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारण्याच्या उंब्रजकरांच्या मागणी बाबत लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रयत्न करुन, हे काम तत्वत: मंजूर करुन घेतल्याबद्दल उंब्रज आणि परिसरातील नागरीकांमध्ये समाधान पसरले आहे.