संपूर्ण राज्यात पाणंद रस्ते योजना शासनामार्फत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. फलटण कोरेगाव मतदार संघात पाणंद रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असून शासनाने पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
फलटण : संपूर्ण राज्यात पाणंद रस्ते योजना शासनामार्फत चांगल्या प्रकारे राबवली जात आहे. फलटण कोरेगाव मतदार संघात पाणंद रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण असून शासनाने पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. पाणंद रस्त्याची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत बोलताना आ. पाटील म्हणाले, महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे. सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे. शेतकर्यांसाठी पाणंद रस्ते ही योजना महत्त्वाची आहे. राज्यामध्ये ही योजना अनेक वर्षांपासून सरकार राबवीत आहे. शेतकर्यांना याचा फायदाही झाला आहे. फलटण कोरेगाव मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पाणंद रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत; परंतु बरेच रस्ते खराब झाले आहेत. पाणंद रस्त्यांची आवश्यक कामे शासनाने तातडीने सुरू करून ती पूर्ण करावीत. शेतकरी कष्टपूर्वक आपल्या शेतामध्ये फळे, पालेभाज्या, ऊस इत्यादी पिके पिकवतो. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करतो. याद्वारे अधिक आर्थिक उत्पन्न घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मात्र पिकवलेला माल रस्त्याअभावी बाहेर काढताना मोठा त्रास व खर्चही होतो. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होते.
शासनाने फलटण कोरेगाव मतदार संघातील पाणंद रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. दरम्यान, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून विधानसभेत पोहोचलेल्या सचिन पाटील यांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा पाणंद रस्त्यांचा प्रश्न मांडून शेतकर्यांची अडचणीची बाजू सभागृहापुढे आणण्याचा प्रयत्न करुन आपणास शेतकर्यांच्या वास्तव प्रश्नांची जाण असल्याचे दाखवून दिले शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली बांधिलकी राहील हे संकेत दिले.