राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसे पक्षाची देखील यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला समोर न येता ठाकरे गटाने थेट यादी जाहीर केली आहे. आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होणार आहेत. गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बडे नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारले जाणार होते. मात्र आजच्या दिवशी अनेकांनी अर्ज दाखल करणे ठरवले आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांचे आज अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पुण्यात देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. कोथरुड विधानसभेसाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुड भागामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, फुलांची उधळण करत चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि शंकर महाराज मठामध्ये दर्शन घेतले. आता पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अर्ज दाखल करण्यासाठी आजचा दिवस निश्चित केला आहे. त्याचबरोबर इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे शक्तीप्रदर्शन सुरु आहे. हर्षवर्धन पाटील हे देखील अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे औक्षण केले. हजारो कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन पाटील यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून धनंजय मुंडे यांना परळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. परळीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत धनंजय मुंडे हे देखील आजच शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
त्याचबरोबर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आत्तापर्यंत मनसेने तीन यादी जाहीर केल्या आहेत. ठाणे शहरातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते देखील आज अर्ज दाखल करणार असून राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.