धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर आणि सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याने तब्बल 35 जणांना हद्दपारीचा मास्टर स्ट्रोक दिला आहे. संबंधितांना आज त्याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या.
सातारा : धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर आणि सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याने तब्बल 35 जणांना हद्दपारीचा मास्टर स्ट्रोक दिला आहे. संबंधितांना आज त्याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी 35 गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उप जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता. याबाबतचा प्रस्ताव पारित करण्यात आला असून संबंधित 35 जणांना गणेशोत्सव कालावधीमध्ये सातारा शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना सावंत्रे म्हणाले, धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर आणि शहरातील धार्मिक वातावरणाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी आम्ही हा प्रस्ताव सादर केला होता. त्यास हिरवा कंदील मिळाला असून संबंधित 35 जणांना याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हद्दपारीमधील कोणीही या कालावधीत सातारा शहरात आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पुढे बोलताना सावंत्रे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील गणपती पाहताना नागरिकांना कोणाचाही संशय आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे सर्व मंडळांनी पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे.