फलटण-लोणंद रस्त्यावर भीषण अपघात

फलटण-लोणंद रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत.
सांगवी : फलटण-लोणंद रस्त्यावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून, चौघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किशोर परशुराम कदम (रा. धारावी, मुंबई, मूळ रा. झरे, ता.आटपाडी, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, कदम कुटुंबीय मुंबईहून कारमधून (एमएच ०१ डीएक्स ८४३८) सांगलीच्या दिशेने जात होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फलटणनजीक स्मशानभूमीजवळील पेट्रोल पंपसमोर चालक मनोज वसंत शिवडीकर (वय ४५, रा. धारावी, मुंबई) भरधाव वेगात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील वळणावर खड्ड्यात घसरली. या अपघातात किशोर कदम यांचा जागीच मृत्यू झाला.
तर लक्ष्मी किशोर कदम, रियांश किशोर कदम, प्रणाली धनंजय कदम आणि चालक मनोज शिवडीकर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत.