हवेत गोळ्या मारून काही जणांचा राजकारणाचा प्रयत्न

मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोरेगावातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला होता.
सातारा : मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोरेगावातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला होता. तसेच या नेत्याच्याच मुलासोबत चिंचकर यांचा ड्रग्ज प्रकरणात अडकलेला मुलगाही शिकायला होता, अशा आरोपामुळे सातार्यातील राजकारणाला उकळी फुटली. या आरोपाला लगेच शशिकांत शिंदे यांनी ठोस उत्तर दिले. काही लोकांना हवेत गोळ्या मारून संशयाची सुई संबंधितांवर आणायची आणि राजकारण करायचे, अशी सवय आहे. काही लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्याकडे यंत्रणा आहे, चौकशी सुरू आहे. जे लोक असे आरोप करत आहेत, त्यांनी आत्महत्या प्रकरणाची माहिती चौकशी यंत्रणांना द्यावी, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.
येथील राष्ट्रवादी भवनामध्ये पत्रकारांनी त्यांना गाठले आणि यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता शशिकांत शिंदे यांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले, ज्यांच्या डोळ्यात पाप आहे, त्यांनाच ड्रग्ज आणि बिल्डर आत्महत्या प्रकरणाची पाळेमुळे कोरेगावात दिसत आहेत. त्यांच्याकडे एवढी माहिती असेल तर त्यांनी ती सरकारी यंत्रणेला द्यावी. उगाच राजकारणासाठी कुटुंबाला मध्ये घेऊ नये. असले फालतू आरोप करणे टाळा, तुमची कारस्थाने बाहेर काढली जातील तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, हवेत गोळ्या झाडून कोणावर तरी संशयाची सुई आणायची आणि राजकारण करण्याचा उद्योग करायचा आहे, हे बरोबर नाही. त्यांचे दारूचे धंदे आहेत ते आम्ही काढू का ? कोल्हापुरात गाई मेल्या, चारा घोटाळा झाला, या प्रकरणाशी माझ्या आरोप करणार्यांचा संबंध आहे. संपूर्ण कोल्हापुरात याची चर्चा सुरू आहे. विद्यमान आमदारांनी कोरेगावची कायदा सुव्यवस्था बिघडून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. आमची मुले सुसंस्कृत आहेत. त्यांना कुठले व्यसन नाही. आम्ही राजकारणाचे पावित्र्य राखतो. आम्हाला आमची पातळी सोडायला लावू नका, असा इशारा शिंदे यांनी दिला.