सिंचनासाठी कोयनेतून ३५०० क्यूसेक विसर्ग

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने बुधवारी दुपारपासून कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी एकूण प्रतिसेकंद 3500 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने बुधवारी दुपारपासून कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी एकूण प्रतिसेकंद 3500 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार यापूर्वी धरणाच्या पायथा वीज गृहातील 20 मेगॅवॅट क्षमतेच्या दोन जनित्राद्वारे 40 मेगॅवॅट वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक तर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आपत्कालीन तथा विमोचक दरवाजातून 1000 असे एकूण प्रतिसेकंद 3100 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत होते.
तथापि, वाढत्या उन्हाळ्यामुळे सिंचनाच्या मागणीत वाढ झाल्याने बुधवारपासून आपत्कालीन विमोचक दरवाजातून 1400 व पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून 2100 असे प्रतिसेकंद 3500 क्युसेक पाणी सध्या पूर्वेकडे सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा 40.12 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 35 टीएमसी इतका तर धरणातील पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2094.2 फूट इतकी आहे.