दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदा बारावीचा निकाल 10 मेच्या आधी तर दहावीचा निकाल 15 मेच्या आधी लागणार असल्याची माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकालाबाबत सांगितले की, 'सर्वांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या. पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केलेय. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.'
पुढे बोलताना शरद गोसावी यांनी सांगितले की, 'यावर्षी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला नाही. त्यामुळे पेपर तपासणी वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे बोर्ड निकालाची जय्यत तयारी करत आहे. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे 87 टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. यापैकी 60 ते 65 टक्के विद्यार्थ्यांचे आयडी मंडळाकडे उपलब्ध आहेत.' तसेच डिजिलॉकरवर निकाल कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे, त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी माहितीही गोसावी यांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी निकाल 20 मे नंतर लागला होता. मात्र यंदा बारावीचा निकाल 10 मेच्या आधी आणि दहावीचा निकाल 15 मेच्या आधी लागणार आहे. या निकालानंतर विद्यर्थाी आणी पालकांना पुढील शिक्षणासाठी रणनिती तयार करता येणार आहे. तसेच यंदा हा दहावी-बारावीच्या तब्बल 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.