पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बुधच्या संतोष जगदाळेंचा मृत्यू

काश्मीर खोर्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात मूळचे खटाव तालुक्यातील बुध येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
खटाव : काश्मीर खोर्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात मूळचे खटाव तालुक्यातील बुध येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. जगदाळे यांच्या मृत्यूची बातमी समजताच बुध गावावर शोककळा पसरली आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील बुध येथील आणि सध्या पिंपरी (पुणे) येथे स्थायिक झालेले संतोष जगदाळे एलआयसी एजंट आणि व्यावसायिक होते. ते स्वतः, पत्नी आणि त्यांची मुलगी जम्मू काश्मीर सहलीवर गेले होते. त्यांच्या बरोबर त्यांचा एक मित्र आणि त्यांची पत्नीही होती. एकूण पाच जणांचा ग्रुप पहेलगाम येथे गेल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथील पर्यटकांवर भ्याड हल्ला करत बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात संतोष जगदाळे यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला होता तर संतोष हे गंभीर जखमी झाल्याची बातमी बुधमध्ये मंगळवारी रात्री समजली होती.
बुधवारी पहाटे उपचारादरम्यान संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच बुध गावावर शोककळा पसरली. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या संतोष जगदाळे यांच्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाल्याने बुधसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियातून या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेधही करण्यात येत आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी जगदाळे कुटुंबातील एका महिलेचाही उत्तराखंडमधील केदारनाथ येथील महाप्रलयात वाहून जावून मृत्यू झाला होता.