साताऱ्यात महाराष्ट्र दिनी 'श्रीमंत योगी' नृत्यनाट्याचे आयोजन

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल येथे गुरुवार दि. १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही कलाकृती सदर करण्यात येणार आहे.
मुंबईचे प्रसिद्ध नृत्य कलाकार वैभव आरेकर दिग्दर्शित 'श्रीमंत योगी' म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाजाची अणि स्वतः छत्रपती श्री शिवाजी महाराजांची सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक स्थिती, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनातील प्रसंगांमधून प्रभावित होऊन सादर केलेली ही नृत्य अभिव्यक्ती आहे. ३५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संचालिका गुरू वैशाली पारसनीस यांनी १९९१ मध्ये साताऱ्यात भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य शैलीच्या प्रशिक्षणाचे बीज रोवले. सातारा तसेच पुणे येथे या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मान्यता मिळालेली सातारा जिल्हयातील ही एकमेव नृत्य संस्था असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचलनालयाकडून राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी नृत्य कला विभागात नृत्यांजली नृत्य संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थीनींना वाढीव गुण देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वैशाली पारसनीस या भारती विद्यापीठाच्या कला विभागात भरतनाट्यम मध्ये पदवी आणि पदव्यूत्तर प्रशिक्षणासाठी नृत्य गुरु म्हणून कार्यरत आहेत. वैशाली पारसनीस यांच्यासह विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारकर इतिहासप्रेमी आणि कलारसिकांसाठी 'श्रीमंत योगी' या नृत्यनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या भव्यदिव्य शास्त्रीय नृत्य कलाकृतीचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.