जेएनपीटी ड्रग्ज प्रकरणाचा गृहमंत्रालयाने सखोल तपास करावा

मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जेएनपीटी येथे 200 किलो ड्रग्स पकडले होते. या ड्रग्ज प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील दोन युवकांची चौकशी करण्यात आली.
सातारा : मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जेएनपीटी येथे 200 किलो ड्रग्स पकडले होते. या ड्रग्ज प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील दोन युवकांची चौकशी करण्यात आली. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. रोजंदारीवर काम करणार्या मुलांकडे 200 कोटीचे ड्रग्स कसे असू शकतील ? असा प्रश्न कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील ज्या युवकाला अटक झाली तो मुंबईतील प्रख्यात बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा आहे. चिंचकर यांनी शुक्रवारी राहत्या घरात स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. त्यांनी सुसाईड नोट मध्ये निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये, असे वाक्य वापरले होते. तोच धागा पकडून शिंदे यांनी एका बड्या राजकीय मंत्र्याने त्यांना दहा कोटी रुपये मागितल्यांचा दावा केला. याचा सखोल तपास मुंबई पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ज्या नाईन एमएम रिव्हॉल्वरने चिंचकर यांनी आत्महत्या केली, ते सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होत नाही. त्यांना हे पिस्तूल कुठून उपलब्ध झाले, असाही सवाल त्यांनी केला. 200 कोटीच्या अमली पदार्थ प्रकरणी चिंचकर यांच्या मुलाला नवीन चिंचकर ला अटक झाली होती तसेच बिचुकले तालुका कोरेगाव येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यामधील सिद्धेश पवार हा गावचा उपसरपंच अद्यापही बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही? का त्याच्या जिवाचे काही बरे वाईट झाले, हे शोधणे गरजेचे आहे, असे महेश शिंदे म्हणाले.
बिचुकले सारख्या गावांमध्ये 200 कोटी रुपयांची अमली पदार्थ बाळगणारे ड्रग्ज पेडलर छोट्या गावात तयार होत असेल तर हा गंभीर विषय आहे. गृहमंत्रालयाने याचा गांभीर्याने तपास करावा. हा प्रश्न मी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. तेव्हा गृह राज्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून याची माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
पण बिचुकले येथील युवकांचे घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ते इतक्या मोठ्या प्रकारांना सामील असतील असे वाटत नाही. एका राजकीय पक्षाचा बडा नेता आणि पोलीस अधिकारी चिंचकर यांना त्यांच्या मुलाचे केसमधील नाव काढण्यासाठी दहा कोटी रुपये मागत होता, असा दावा चिठ्ठी मध्ये करण्यात आला आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.