ऑपरेशन सिंदूरने देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत.
सातारा : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ ठिकाणांवर भारतीय लष्कराने हल्ले केले आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराला कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आलेले नाही. ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, अशी कारवाई भारतीय लष्कराने केली. या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी भारतमाता की जय, असे म्हणत आनंद व्यक्त केला.
याबाबत त्यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पंधरा दिवसांपूर्वी काश्मीरच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक पहलगाम येथे गेले होते. या नि:शस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तुमचा धर्म कोणता, असे विचारून हिंदू-मुसलमान नागरिकांना वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी काही जणांना कुराणातील 'आयत' म्हणायली लावली. ज्यांना म्हणता आली नाही, त्यांना त्याक्षणी गोळ्या मारण्यात आल्या. या हल्ल्यात जवळपास २७ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला.
पहलगाममधील दहशतवाद्यांनी बैसरन पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा त्यांनी कोणत्याही महिलेची हत्या केली नाही. खरे तर, दहशतवाद्यांना केवळ पुरुषांना लक्ष्य करून त्यांनाच मारण्याचा प्लॅन होता. म्हणूनच भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. आपल्या आई-बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे चांगलाच धडा शिकवला असून त्याचा आनंद होत असल्याचे राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.