राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार श्रीनिवास वनगा यांची चर्चा होत आहे. श्रीनिवास वनगा सोमवारी संध्याकाळी सात वाजेपासून बेपत्ता आहे. घरातून एका पिशीवीत काही कपडे घेऊन ते गेले अन् नॉट रिचेबल झाले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांकडे मन मोकळे केले.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार श्रीनिवास वनगा यांची चर्चा होत आहे. श्रीनिवास वनगा सोमवारी संध्याकाळी सात वाजेपासून बेपत्ता आहे. घरातून एका पिशीवीत काही कपडे घेऊन ते गेले अन् नॉट रिचेबल झाले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांकडे मन मोकळे केले. ते ढसाढसा रडले होते. आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता ते नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. त्याच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त लावला आहे. यावेळी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांनी ‘टीव्ही ९ मराठी’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. एकनाथ शिंदे यांनी आमचा विश्वासघात केला आहे, असे श्रनिवास वनगा यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.
उमेदवारी न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार श्रीनिवास वनगा हे आपली इनोव्हा कार आणि बॉडीगार्डला काहीच न सांगता पायी घर सोडून निघून गेले आहेत. त्यांची MH ४८, V ४८४८ नंबरची इनोव्हा कार त्यांच्या पार्किंगमध्येच आहे. त्यांचा बॉडीगार्डसुद्धा घरीच आहे. त्यांचा कोणताच पत्ता लागला नसल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत आहेत.
कुटुंबियांचा आरोप असा...
शिवसेना शिंदे गटाकडून आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट देण्यात आले नाही. त्याच्याऐवजी पालघरमधून राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आले. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने गेल्या 17 तासांपासून त्यांनी फोन बंद केला आहे. ते घरी काहीच न सांगता निघून गेले आहे. ते बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहेत. श्रीनिवास वनगा हे शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार होते.
एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी ते सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते. त्यावेळी असणाऱ्या 40 पैकी 39 आमदारांना तिकीट देण्यात आले. परंतु श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली नाही. त्यांना उमेदवारी डावलल्यामुळे ते नैराश्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मोठा विश्वासघात केला आहे. आम्हाला धोका दिला आहे. उद्धव ठाकरे हे देव माणूस आहे. त्याची साथ सोडून चूक झाली, असे म्हटले आहे.
राजेंद्र गावित यांचा अर्ज दाखल
दरम्यान पालघरमधून आज राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के आले होते. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असली तरी काही निर्णय हे नाईलाजास्तव घ्यावे लागतात. तसेच श्रीनिवास वनगा यांनी काल प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ही रागातून दिली असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.