महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दवबिंदू गोठून त्यांचे हिमकणांत रूपांतर झाले.
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दवबिंदू गोठून त्यांचे हिमकणांत रूपांतर झाले. थंडीचा कडाका वाढत असतानाच मंगळवारी पहाटे येथील प्रसिद्ध वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील तापमानाचा पारा 4 अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे या परिसरात हिमकणांची चादर पसरली. वेण्णालेक जेटी आणि वाहनांच्या टपांवर बर्फ तयार झाला. दरम्यान, महाबळेश्वरकरांसह पर्यटनासाठी शहरात दाखल झालेले पर्यटक या थंडीचीही मजा लुटत आहेत.
महाराष्ट्राचे नंदनवन व पर्यटकांचे हक्काचे डेस्टिनेशन असणार्या महाबळेश्वरला काही दिवसांपासून हुडहुडी भरली आहे. चार ते पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन गारठले असले तरी निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्याची उधळण परिसरात होत आहे. शहरासह वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये शहरापेक्षा पारा खालीच आहे. मागील काही दिवसांत वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील तापमानाचा पारा 7 अंशा होता. मात्र, सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे हाच पारा 4 अंशापर्यंत आणखी घसरला आणि परिसरात सर्वत्र दवबिंदू गोठून त्याचे हिमकणात रूपांतर झाले होते. त्यामुळे अनेक भागात बर्फाची चादर पसरल्याचा भास होत होता. वेण्णा तलावावर नौकाविहारसाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणार्या लोखंडी जेटीवर आणि वाहनांच्या टपावर मोठया प्रमाणात हिमकण साचल्याचे दिसून आले. हंगामातील पहे पहिलेच हिमकण असून याचा आनंद स्थानिकांसह पर्यटकांनी लुटला. दरम्यान, या कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णालेक व लिंगमळा परिसर चांगलाच गारठला. ठिकठिकाणी शेकोट्या करून नागरिक व पर्यटक शेकत बसल्याचे चित्र आहे.
सातार्यातही चार वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद
सातार्याची भौगोलिक स्थिती पाहता हिवाळ्यात या शहराचे तापमान साधारणपणे 10 अंशांच्या खाली कधीही आले नव्हते. मात्र, राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेत मंगळवारी मागील चार वर्षांत प्रथमच सातारा शहराचे तापमान 9 अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे बोचर्या थंडीमुळे सातारकरांना दिवसभर हुडहुडी भरली होती. यापूर्वी 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात 9 अंशांवर तापमानाचा पारा घसरला होता. दरम्यान, या वर्षी मुबलक पावसाळा झाल्याने थंडीदेखील कडाक्याची पडेल, हा हवामान अभ्यासकांचा अंदाज खरा ठरत असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून सातारकरांना येत आहे.