साताऱ्यासह जिल्हयात आणि जिल्हयाबाहेर साहित्य क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने बिनविरोध झाल्या.
सातारा : साताऱ्यासह जिल्हयात आणि जिल्हयाबाहेर साहित्य क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने बिनविरोध झाल्या. या शाखेच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी नंदकुमार सावंत, कार्याध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत बेबले तर उपाध्यक्षपदी विक्रम पाटील यांची निवड करण्यात आली. नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झालेल्या वार्षिक सभेस शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ट साहित्यिक किशोर बेडकिहाळ आणि सदस्य उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी नंदकुमार सावंत, कार्याध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून किशोर बेडकिहाळ, डॉ. उमेश करंबेळकर, अमर बेंद्रे, आर.डी.पाटील, सौ.ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी शाखेचा वार्षिक अहवाल ॲड. चंद्रकांत बेबले यांनी सादर केला. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन अमर बेंद्रे यांनी केले तर नोटीशीचे वाचन सचिन सावंत यांनी केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी शाखेने गेल्या तेरा वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. या कालावधीत शाखेने साताऱ्यात तसेच राज्यात मोठा ठसा उमटवल्याचे सांगितले. योग्य वेळी नवीन लोकांकडे धुरा सोपवणे गरजेचे आहे. नवीन लोकांना काम करण्यास वाव दिला म्हणजे नेतृत्व आपोआप मोठे होते. आतापर्यंत सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या शाखेमुळेच आपण जिल्हा प्रतिनिधी, साहित्य महामंडळ, कोषाध्यक्षपदी काम करु शकलो. नवीन पदाधिकाऱ्यांनी शाखेचे कार्य आणखी जोमाने करावे अशी अपेक्षा व्यक्त केले. या कार्यात आपणाला सर्व पदाधिकाऱ्यांबरोबरच रवींद्र बेडकिहाळ, किशोर बेडकिहाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आवर्जुन सांगितले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ म्हणाले, विनोद कुलकर्णी हे योग्यवेळी योग्य निर्णय घेत घेतात सर्वांना बरोबर घेऊन चालतात आणि सर्वांना काम करण्याची संधी देतात त्यामुळेच त्यांचे नेतृत्व मोठे असल्याचे आवर्जून सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकुमार सावंत म्हणाले, विनोद कुलकर्णी यांच्यामुळेच साहित्यात काम करण्याची संधी मिळाली. मसाप, पुणे जिल्हा प्रतिनिधीबरोबरच आता शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे. ही संधी दिल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सहकार्याने शाखेचे काम आणखी वाढत जाईल अशी ग्वाहीही दिली. याप्रसंगी ॲड. चंद्रकांत बेबले, अजित साळुंखे, विक्रम पाटील, डॉ. उमेश करंबेळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अजित साळुंखे यांनी केले. अनिल जठार यांनी आभार मानले. याप्रसंगी वजीर नदाफ, उमेश पाटील, महेंद्र पुराणिक, सुरेंद्र वारद, किरण कदम, सतीश घोरपडे, सोमनाथ पवार, आशिष दळवी, हेमंत पंडित आणि सदस्य उपस्थित होते.