कराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
सातारा : कराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आ. चव्हाण यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, निवासराव थोरात, विद्या थोरवडे, माजी नगराध्यक्षा निलम येडगे, मराठा महासंघाच्या वैशाली जाधव, भानुदास माळी, गितांजली थोरात, प्रा. धनाजी काटकर, शिवाजीराव मोहिते, रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आ. चव्हाण म्हणाले, ही विधानसभा निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कराडकर आपल्याला आशीर्वाद देतील. सध्या बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक, व्यापार्यांना त्रास होऊ नये, यासाठी आपण कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन न करता अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले, एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देते. तर दुसरीकडे नगरसारख्या ठिकाणी महिलांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. याबाबत भाजपच्या कोणत्याही पदाधिकार्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही.