सातारा शहर परिसरातून 4 व पुणे येथून 1 अशा एकूण 5 दुचाकी चोरी करणार्याला शहर पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडील वाहने जप्त केली.
सातारा : सातारा शहर परिसरातून 4 व पुणे येथून 1 अशा एकूण 5 दुचाकी चोरी करणार्याला शहर पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडील वाहने जप्त केली.
प्रल्हाद शिवाजी पवार (वय 26, रा. अजंठा चौक, सातारा) असे संशयित चोरट्याचे नाव असून तो सध्या तडीपारीत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी) रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यातील एकजण मोटारसायकल चोरीमध्ये तडीपार केलेला सराईत चोरटा सातारा शहरामध्ये दिसून आल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस सलग चार दिवस त्याच्या सराईत चोरट्याच्या रहाते घराच्या परिसरामध्ये पाळत ठेवून होते. या दरम्यान, तो संशयित चोरटा सातारा शहरामध्ये मोटरसायकल चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. संशयित माहुली गावच्या कमानीजवळ मोटरसयाकलसह दिसून येताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच संशयित मोटरसायकलसह कोरेगाव दिशेने पळून जावू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतले. पोलिसांनी मोटारसायकल बाबत कागदपत्रांची विचारपूस केली असता त्याच्याजवळ वाहनाची कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करताच ती दुचाकी चोरी केली असल्याचे कबुली त्याने दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने एकूण 5 मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले. त्यापैकी 1 पुणे व 4 सातारा शहरातून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त करुन त्याला अटक केली.
पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलीस सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, निलेश यादव, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.