ना बटेंगे, ना कटेंगे. हा महाराष्ट्र आहे, बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात प्रज्वलित केली. ज्या मशालीने स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या.
सातारा : ना बटेंगे, ना कटेंगे. हा महाराष्ट्र आहे, बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात प्रज्वलित केली. ज्या मशालीने स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या. तीच परिवर्तनाची मशाल हाती घेतलेल्या अमितदादांना विधानसभेत पाठवायचे आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी परळी विभागातील जाहीर सभेत नागरिकांना आवाहन केले.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे, उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अमितदादा कदम यांच्या प्रचारार्थ परळी विभागातील भोंदवडे फाटा येथील मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, उमेदवार अमितदादा कदम, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हनुमंत चवरे, राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्ष रजनी पवार, शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्रातील गत अडीच वर्षातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर टीकेची झोड उठवत नितीन बानुगडे पाटील म्हणाले, पटसंख्या कमी म्हणून शाळा बंद पाडल्या. महागाई वाढवली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या दावणीला नेऊन बांधले, इथला शेतकरी उध्वस्त झाला. मंत्र्यांच्या वैयक्तिक मालमत्तेने कोटीच्या कोटी उड्डाणे केली. परंतु सामान्य महिलेच्या पदरात काय तर पंधराशे रुपये! हे चित्र बदलायचं असेल तर महाराष्ट्रात सत्ता बदल अटळ आहे. अमितदादांच्या रूपाने सक्षम नेतृत्व विधानसभेत पाठवून सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातही परिवर्तन घडवून आणायचे आहे. आणि हे काम येथील जनता उद्याच्या 20 तारखेला करेल.
अमितदादा यांनी आपल्या भाषणात परळी खोऱ्यातील ठेकेदारी वृत्तीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, पावसाळ्यापूर्वी झालेली रस्त्यांची कामे एका पावसात वाहून गेली. परळीकडे येणाऱ्या रस्त्यामुळे काही डझन अपघात झाले. अनेक दुचाकीस्वार जायबंद झाले. रस्ता दुरुस्त करायचे दूरच जखमींची साधी विचारपूसही कोणी केली नाही. मुठभर ठेकेदार बगलबच्चांना सांभाळण्याचे काम मात्र इमाने इतबारी सुरू आहे. हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत की ठेकेदारांचे असा प्रश्न सर्वसामान्य जनता आता उघडपणे विचारू लागली आहे. येथील जनतेला गृहीत आणि वेठीस धरण्याचे राजकारण आता फार काळ टिकणार नाही.
राष्ट्रीय काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष माधवी वरपे, शिवराज टोणपे, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवींद्र भणगे, एस. एस. पारर्टेगुरुजी, सज्जनगड विभाग संघटक नारायण निकम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विष्णू लोटेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय कदम, सागर धोत्रे, अनिल गुजर, शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रणव सावंत, शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रफुल्ल जाधव, तानाजी चव्हाण, शिवसेनेचे परळी विभाग प्रमुख किशोर साळुंखे, निरज नांगरे, गणेश शिंदे, दत्तात्रय नलवडे, नितीन गोळे, रवींद्र पारटे, परवेज शेख, महेश शिर्के तसेच परळी विभागातील महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या.