विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारी 17 नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर कोणाची सभा होणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारी 17 नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर कोणाची सभा होणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी जाहीर सभेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विनंती अर्ज दिले होते. त् त्यानंतर परवानगीचा वाद हा नगर विकास विभागाकडे गेला. आता, नगर विकास विभागाने सभेसाठी आलेल्या अर्जावर निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे. त्यामुळे या एका दिवसासाठी राजकीय पक्षांचे अर्ज आले होते. शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने अर्ज केले होते.
कोणाला मिळाले मैदान?
जाहीर सभेसाठी शिवाजी पार्क मैदान हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाले आहे. त्यामुळे रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. सभेसाठी मैदान मिळावे यासाठी मनसेकडून सर्वात आधी अर्ज आला होता. त्यामुळे नगरविकास विभागाने त्याआधारे परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी सभांचा कार्यक्रम मनसेच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवरील सभेचा उल्लेख आहे. ज्यात संध्याकाळी 4.30 वाजता शिवतीर्थावर सभा होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवघे 2-3 दिवस शिल्लक असतानाही निवडणुक आयोगाकडून मात्र 17 तारखेला मैदान कुणाला देणार याबाबत स्पटता नाहीच. त्यामुळे गोंधळाची स्थिती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन…
17 नोव्हेंबर हा दिवस शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. या दिवशी मैदान परिसरात असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठी रीघ लागलेली असते. त्यामुळे 17 नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह, शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू होते.