पुणे-बेंगलोर महामार्गावरील बोरगावच्या हद्दीत बोरजाई मंदिरासमोर गांजा विक्री करण्यासाठी येणार्या सत्यवान बाळकृष्ण साळुंखे रा. बोरगाव, ता. जि. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नागठाणे : पुणे-बेंगलोर महामार्गावरील बोरगावच्या हद्दीत बोरजाई मंदिरासमोर गांजा विक्री करण्यासाठी येणार्या सत्यवान बाळकृष्ण साळुंखे रा. बोरगाव, ता. जि. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार रुपये किमतीचा चार किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित इसमाकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व एक लाख तीस हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अमली पदार्थाची वाहतूक करणार्या इसमांवर कठोर कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. देवकर यांना खात्रीशीर बातमीदाराकडून बोरजाई मंदिर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने सदर परिसरात बोरगाव पोलिसांच्या सहकार्याने सापळा रचला व तेथे आलेल्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला. संबंधिताकडून मोबाईल दुचाकी असा दोन लाख 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गांजाची किंमत एक लाख दहा हजार रुपये इतकी आहे.
बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये संबंधिताच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (1 ) व 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत परितोष दातीर, आतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, प्रवीण पवार, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, संभाजी साळुंखे, दौलत जगदाळे, राजू कुंभार, अमोल निकम, रुद्रायन राऊत, बोरगाव पोलीस ठाण्याचे आमदार प्रशांत चव्हाण, केतन जाधव, संजय जाधव यांनी सहभाग घेतला होता.