कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम
जागतिक वारसास्थळाचा मान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
सातारा : जागतिक वारसास्थळाचा मान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे. कास पठार हंगाम 2026 चा अधिकृत शुभारंभ आज (दि. 1 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता कास पठारावर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधव-पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
पावसाळ्यानंतर कास पठारावर उमलणार्या विविधरंगी रानफुलांचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक सातार्यात दाखल होतात. यंदाही पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि कास पठार व्यवस्थापन सज्ज झाले आहे. फुलांच्या संवर्धनासोबतच पर्यटकांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
कास पठारावरील नाजूक जैवविविधता आणि दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करत पर्यटनाचा आनंद पर्यटकांना घेता यावा, यासाठी विविध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पर्यटकांनी पठारावरील फुले न तोडता आणि पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी कास पठारावर प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक राहणार असून, पर्यटकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आगाऊ नोंदणी करूनच पर्यटनाचे नियोजन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.