नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास
शहरातील प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सातारा : शहरातील प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी आपल्या प्रभागातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. सातारा शहराची भौगोलिक रचना ही उंच-सखल असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत लगतच्या अजिंक्यतारा किल्ला आणि यवतेश्वर डोंगरावरून पाण्याचा मोठा प्रवाह खाली येतो. या प्रवाहासोबत वाहून येणारा कचरा शहरातील नाले आणि ओढ्यांमध्ये साचतो, ज्यामुळे शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी प्रभागातील प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी करत प्रत्यक्ष कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी विविध भागात तातडीने स्वच्छता कामे हाती घेण्यात आली आहेत. गुरुवार परज परिसरातील वखारीच्या जागेत साचलेल्या लाकडांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आल्यावर आरोग्य निरीक्षक पांडुरंग जाधव आणि संबंधित मुकादमांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. साचलेली लाकडे हटवून डासांचा नायनाट करण्यासाठी तातडीची पावले उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पोलीस करमणूक केंद्र ते तालीम संघ या राजपथ रस्त्याच्या कडेला प्रचंड प्रमाणात वाढलेले गवत पूर्णपणे काढून रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे.
तसेच दंग्या मारुती मंदिर ते औंधकर परिसराच्या पाठीमागील भागात वाढलेले गवत आणि झाडीझुडपे हटवून तो भाग मोकळा करण्यात आला. चौधरी यांच्या घराच्या मागील बाजूस साचलेला सर्व कचरा उचलून संपूर्ण परिसर पूर्ववत स्वच्छ करून देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर रावखंडे बोळ येथे तावसकर यांच्या घराजवळील चेंबर तुंबल्याची तक्रार प्राप्त होताच, नगरसेवकांनी वेळ न घालवता तत्काळ सक्शन व जेटिंग मशीन घटनास्थळी मागवून चेंबरची पूर्ण स्वच्छता करून दिली.
नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी नागरिकांच्या आरोग्याप्रती दाखवलेली ही तत्परता, कर्तव्यदक्षता आणि प्रत्यक्षात केलेली धडक कारवाई यामुळे प्रभागातील वातावरण समाधानकारक बनले आहे. ऐन पावसाळ्यात उद्भवणार्या साथीच्या रोगांपासून दिलासा मिळाल्यामुळे प्रभाग क्रमांक 14 मधील स्थानिक रहिवाशांनी नगरसेवकांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.