सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी
सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. या बैठकीत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्रलंबित आरोग्य प्रकल्प, वैद्यकीय मनुष्यबळ, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि नवीन आरोग्य पायाभूत सुविधांबाबत सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून एमआरआय, कॅथलॅब, सुविधा लवकरच उपलब्ध होणार असून सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
बैठकीत सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणींची गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) यांसारखी महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. मंजूर 30 वैद्यकीय अधिकारी पदांपैकी केवळ 10 पदे भरलेली असून तब्बल 20 पदे रिक्त असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासह तसेच ग्रामीण रुग्णालय, मेढा, सोमर्डी, काशिळ आणि जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याचे निर्देश देण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ आरोग्य सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावी यासाठी मेढा, सोमर्डी आणि काशिळ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास सातारा जिल्हा रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
बैठकीत सातारा जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅथलॅब (Cath Lab) प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या कॅथलॅब सुविधेचे काम तातडीने पूर्ण करून आवश्यक तांत्रिक परवानग्या मिळवत लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कार्डिओलॉजिस्ट, तंत्रज्ञ आणि आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदभरती तातडीने करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील एमआरआय सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. एमआरआय सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल.
बैठकीत मंजूर 50 खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या बांधकामाला तातडीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचारपद्धतींचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या 100 खाटांच्या स्वतंत्र स्त्री रुग्णालयाच्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी ₹9.50 कोटींच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित बांधकाम, फर्निचर, विद्युत व्यवस्था, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, मनुष्यबळाची नियुक्ती आणि इतर सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे रुग्णालय लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. या रुग्णालयामुळे माता व बाल आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक उंचावणार आहे.
बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, पायाभूत सुविधा आणि विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यांची वेळेत पूर्तता करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, सहसंचालक (रुग्णालये) डॉ. सुनिता गोल्हाईत उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे उपसंचालक (पुणे) भगवान पवार, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक,डाॅ राहूल जाधव छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवा देण्याबात सर्वोच्च प्राधान्य देत असून रिक्त पदे भरणे, प्रलंबित आरोग्य प्रकल्प पूर्ण करणे, एमआरआय व कॅथलॅबसारख्या सुविधा सुरू करणे तसेच ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल तत्काळ उचलले जातील."
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, मा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या पुढाकारातून मंजूर झालेले एमआरआय, कॅथलॅब सुविधा तसेच जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील रिक्त पदभरतीसह सर्व निर्णयांची अमलबजावणी तत्काळ करण्याबरोबरच , सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे या वेळी स्पष्ट केले.