कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर
पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि वरदान ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले असून ते "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्यात आले आहे.
सातारा : पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि वरदान ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले असून ते "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्यात आले आहे. राज्य सरकारने या संदर्भातील ऐतिहासिक निर्णय घेतला असून जलसंपदा विभागाने बुधवारी अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
यापूर्वी कोयना धरणाच्या या विस्तीर्ण जलाशयाला 'शिवसागर' किंवा 'शिवाजी सागर' या नावाने ओळखले जात होते. मात्र, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करणे अयोग्य आहे, अशी भावना शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून सातत्याने व्यक्त होत होती. जलाशयाला महाराजांचे पूर्ण आणि आदरयुक्त नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
या जनभावनेची आणि शिवप्रेमींच्या मागणीची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विशेष पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडे या नामांतराचा अधिकृत प्रस्ताव सादर केला होता. जलसंपदा विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, कोयना जलसागराचे हे नामांतर म्हणजे केवळ नावातील बदल नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा, इतिहासाचा आणि गौरवशाली वारशाचा शासनाने केलेला हा सन्मान आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा, पाटण तालुका तसेच संपूर्ण राज्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.