‘शिवकला चषक’ स्पर्धेत ४३ भजनी मंडळांचा सहभाग
महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री जानाई-मळाई शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक, समाजभूषण -दलितमित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरुजी) यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘शिवकला चषक जिल्हास्तरीय भजनी मंडळ स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा : महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री जानाई-मळाई शिक्षण संस्था, सातारा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक, समाजभूषण -दलितमित्र स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरुजी) यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘शिवकला चषक जिल्हास्तरीय भजनी मंडळ स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने स्मारकमंदिर (लोकमान्य विद्यालय मंदिर), माने कॉलनी, देगाव रोड, एमआयडीसी, सातारा येथे होणार आहे.
या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सातारा व आसपासच्या जिल्ह्यांतील नामांकित ४३ भजनी मंडळांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने स्व. शिवराम लक्ष्मण माने (गुरुजी) यांचा पुण्यतिथी सोहळा, संस्थेच्या ‘शिवकला दिनदर्शिके’चा प्रकाशन सोहळा तसेच संस्थेच्या ‘एक मूल – एक मूठ धान्य’ या उपक्रमांतर्गत संकलित करण्यात आलेल्या सुमारे दोन टन अन्नधान्याचे गरजू शाळा व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेशदादा शिंदे, माजी आमदार आनंदाराव पाटील (नाना), जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजुभैया भोसले, भाजप सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक सुनील काटकर (तात्या), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणवराज देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. विक्रम (पापा) पवार, नगरसेवक अविनाश कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, संदीप शिंदे, अॅड. नितीन शिंगटे, सागर भोसले, ह.भ.प. बाबा महाराज गजवडकर, ह.भ.प. रवींद्र महाराज लोहार यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध भजनी मंडळ परीक्षक तथा संगीत अलंकार बाळासाहेब चव्हाण (सर), कुसवडे तसेच दूरदर्शन व आकाशवाणी केंद्र मान्यताप्राप्त कलाकार डॉ. सुनील राजे करणार आहेत.
स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी स्वीकारली आहे. सहभागी भजनी मंडळांसाठी माने-जाधव परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार दत्तात्रय विलासराव काळे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रतिभा जाधव, वैशाली भिसे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
भजन, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या शिवकला चषक स्पर्धेच्या माध्यमातून संतपरंपरेचा वारसा जतन करण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची रुजवण होणार आहे.